एक्स्प्रेशन लॅब – गोइंग सोलो स्पर्धात्मक नाट्यमहोत्सवासंबंधी काही

नमस्कार !

Pradeep-Vaiddy-1 औंध येथील स्पार्कल्स, प्रोग्रेसिव्ह ड्रॅमॅटिक असोसिएशन, महाराष्ट्र कल्चरल सेंटर, पं सत्यदेव दुबे यांचेसोबत नाट्यशिक्षणाचं काम करत करत स्वतःला जाणवलेल्या काही शक्यतांच्या आधारे मी साडेतीन वर्षांपूर्वी एक्स्प्रेशन लॅब ही नाट्यप्रशिक्षणाची प्रणाली स्वतःच विद्यार्थ्यांपर्यंत न्यायला सुरूवात केली. आज एक्स्प्रेशन लॅबची चौदावी बॅच चालू असून आजवर झालेल्या तेरा बॅचेस् मधून १६२ विद्यार्थ्यांनी आपल्या नाट्यप्रवासाला सुरूवात केली आहे. पहिल्या बॅचमधील काहीजण आता नाट्यक्षेत्रात आश्वासक काम करीत आहेत तर तेराव्या बॅचपर्यंतच्या विविध विद्यार्थ्यांचं विविध पातळ्यांवर काम या क्षेत्रात चालू आहे.

एक्स्प्रेशन लॅबची प्रणाली ही या क्षेत्रातील एक प्रयोगच आहे. कोणत्याही एका शिक्षण पध्दती किंवा इझम् चा अतिरेक न करता, मला या क्षेत्रात जाणवलेल्या काही बाबींच्या आधारे, नाटक या माध्यमासाठी आवश्यक तो वैचारिक दृष्टिकोण विद्यार्थ्यांमधे तयार झाला पाहिजे या हेतूने मी एक्स्प्रेशन लॅबची बांधणी केली आहे. नटाचं मन, शरीर, आवाज, भावना या बाबींचा प्रामुख्याने विचार करत विविध प्रात्यक्षिकांच्या आधारे आपण अभिव्यक्तीचं जे “काम” करायला निघालो आहोत त्याचेप्रति जास्त जबाबदार बनत जाण्याची ही प्रक्रिया आहे. साधारण २१ ते २४ दिवसांची एक कार्यशाळा असते. एका दिवशी साधारण साडेतीन ते साडेपाच तास काम चालते. शंभर टक्के उपस्थितीची अनिवार्यता महत्वाची बाब आहे. यामुळे बॅचमधे भरपूर मुलं कधीच नसतात पण कदाचित त्यामुळेच नाटक किंवा अभिनय करण्याची खरी ऊर्मी यामुळे कसास लागते हे नक्की.पण अनुभव असा आहे की या नियमाचा अडसर फारसा येत नाही. १६२ जणांनी ही कार्यशाळा (काही जणांच्या बाबतीत चार चार वेळा) पूर्ण केली आहे आणि आजवर केवळ ८ जणांना उपस्थितीच्या मुद्द्यावरून कार्यशाळा सोडावी लागली आहे. वारेमाप शुल्क न घेता, योग्य तितक्या नेमकेपणाने आणि वैयक्तिक लक्ष देत मार्गदर्शन करण्यावर माझा भर असतो. माझ्या या कार्यशाळेत माझे असिस्टंट्स् शिकवण्याचं काम करताहेत हे दृश्य कधीही दिसत नाही. बरंचसं प्रशिक्षणाचं काम मीच स्वतः करतो. माझ्या सहकार्याला मोहित टाकळकर, रूपाली भावे, अश्विनी गिरी, आनंद चाबुकस्वार आणि सागर देशमुख यांना त्या त्या बॅचच्या आवश्यकतेनुसार मोजक्या तासिकांसाठी आणि अभिनय / अभिव्यक्तीविषयक विशिष्ठ विषयांसाठी मी बोलावत असतो. प्रत्येक बॅचचा बाह्य आराखडा ढोबळमानाने तोच असला तरीही जे कामकाज चालतं ते पूर्णपणे भिन्न असतं. म्हणूनही काही वेळा माझ्या काही विद्यार्थ्यांनी चार चार वेळा माझी ही कार्यशाळा केली आहे. अभिनयाची पहिली पायरी म्हणून करायला लागणारा स्वतःचा विचार हा अनेकांना आयुष्यभराचे लाभ देऊन जातो अशी नोंद अनेकांनी केली आहे. कार्यशाळेचे सर्वच विद्यार्थी अभिनेते किंवा तंत्रज्ञ झालेत असंही नाही. पण काही जण या क्षेत्राच्या ग्लॅमरला भुलून आले असता ह्या क्षेत्रात टिकाव लागण्यासाठी आदर्श बाबी पाहाता त्यांनी आपले निर्णय बदललेही आहेत. त्याबाबतीत ते एक्स्प्रेशन लॅबचे आभार मानतात.

तर अशा ह्या लॅबचे विद्यार्थी जेव्हा बाहेर पडतात आणि हौशी किंवा प्रायोगिक स्वरूपाचं काम करू लागतात तेव्हा शिकलेल्या सर्व बाबींचा वापर करायला योग्य असा मंच त्यांना मिळतोच असं नाही. स्वतःचा कस खऱ्या अर्थाने लागेल अशा भूमिका त्यांना दिल्या जातीलच असं नसतं. या परिस्थितीवर मी काहीतरी केलं पाहिजे असं मला वाटत होतं आणि यावर्षी मला गोइंग सोलो या एका कलाकाराने रंगमंचीय सादरीकरण करत जाण्याच्या महोत्सवाची कल्पना सुचली.

गोइंग सोलो मधे एकपात्री (खरंतर एक पात्र नव्हे एक-कलाकार) स्वरूपाचे रंगमंचीय सादरीकरण करणे अपेक्षित आहे. किमान १५ मिनिटे व जास्तीत जास्त वेळ गरजेनुसार Pradeep-Vaiddyaअसू शकेल असा नियम आहे. सादरीकरण करणाऱ्या कलाकाराने एक्स्प्रेशन लॅबचे माजी विद्यार्थी / विद्यार्थिनी असणे आवश्यक आहे. सहाय्यक संघातील सदस्य इतर कोणीही असू शकतील. रंगमंचीय जागेचा, अवकाशाचा वापर करून, नटाकडून अपेक्षित देहबोली, आवाज यांचा वापर करीत हे सादरीकरण झाले पाहिजे अशी अपेक्षा आहे. हा नाट्य महोत्सव स्पर्धात्मक असून यातील तीन उत्कृष्ट सादरीकरणांना प्रत्यकी १०००० रूपये रोख पुरस्कार दिले जातील. या तीन सादरीकरणात कोणताही अनुक्रम लावला जाणार नाही. याशिवाय या तीन सादरीकरणांचे या महोत्सवानंतर तीन एकत्रित प्रयोग माझ्याकडून पुरस्कृत केले जातील.

गोइंग सोलो स्पर्धात्मक महोत्सव दोन महिन्यापूर्वी मी जाहीर केल्यावर खूप उत्साहाचं वातावरण एक्प्रेशन लॅब परिवारात दिसून आलं. पण प्रत्येकाला या पध्दतीच्या सादरीकरणाविषयी कमालीचं औत्सुक्य होतं. त्या दृष्टीने एक विनामूल्य विशेष मार्गदर्शन शिबिर मी आयोजित केलं. या शिबिराच्या पहिल्या चरणात अतुल पेठे (आनंद ओवरी वर आधारित एकपात्री प्रयोगाचे दिग्दर्शक) आणि आशुतोष पोतदार (लेखक, फ्लेम चे नाट्यविभागाचे सध्याचे प्रमुख आणि भारतीय पातळीवर विविध कलाप्रकारांशी संवाद साधणारे अभ्यासक) यांचं विशेष मार्गदर्शन इच्छुकांना उपलब्ध करून देण्यात आलं. काही चित्रफिती दाखवून, काही परंपरांचा परामर्श घेत हे शिबिर वळलं ते दुसऱ्या चरणाकडे. दुसऱ्या चरणात आसक्त संस्थेच्या सध्या चालू असलेल्या “महादेवभाई” या एक-कलाकार पध्दतीच्या सादरीकरणातील नट ओंकार गोवर्धन आणि दिग्दर्शक वरूण नार्वेकर यांच्याशी थेट गप्पा झाल्या. या गप्पा आणि आधीच्या सत्रातून स्वतःला पाहिजे ते पदरात घेत, अत्यंत उत्साहाने २२ जणांनी तयारी सुरू केली. सर्वाना सादरीकरणाची जागा त्यांच्या सोयीने ठरवण्याची मुभा होती. सर्वानुमते भरत नाट्य मंदिर असं ठरलं आणि दिनांक २९ नोव्हेंबरचा पूर्ण दिवस आणि दिनांक ३० नोव्हेंबरला दुपारी चारपर्यंत असा हा महोत्सव आयोजित केला गेला आहे. सकाळी नऊ वाजल्यापासून पहिल्या दिवशी १५ आणि दुसऱ्या दिवशी ७ अशी सादरीकरणं होणार आहेत. काही सादरीकरणं पूर्णपणे नव्याने लिहिली गेली आहेत. वसंत आबाजी डहाके, नितीन कुलकर्णी यांच्या कवितांवर आधारित सादरीकरणं, चेतन दातार लिखित १ माधवबाग, इंदुची गोष्ट किंवा टेल ऑफ अ टायगर हे दारियो फो यांचं नाटक किंवा अनुभव दिवाळी अंकातील हजार वेळा शोले पाहिलेला माणूस या लेखावर आधारित सादरीकरण, र. धों. कर्वेंची कथा सांगणारं किंवा मलालाची कथा सांगणारं अशी विविधांगी सादरीकरणं यामधे आहेत. हिंदी, मराठी किंवा इंग्रजी भाषेचा वापर करता येणार आहे. बहुतांश सादरीकरणं मराठी असली तरी काही मराठी कलाकार हिंदी किंवा इंग्रजी सादरीकरणांचा प्रयत्न करीत आहेत. बहुतांश सादरीकरणं २० ते ३५ मिनिटांची आहेत आणि उरलेली काही ४५ मिनिटांपर्यंतची आहेत. सर्वांनी आपापले दिग्दर्शक, नेपथ्य-प्रकाशयोजनाकार आणि संगीतकार नेमले आहेत. तालमी जोरात चालू आहेत.

दोन जणांचं परीक्षक मंडळ या सर्व महोत्सवाचा परामर्श घेत तीन उत्तम सादरीकरणं निवडेल. या तीन सादरीकर्त्यांना दिनांक १ डिसेंबर २०१३ रोजी सायं ६.३० वाजता एका छोटेखानी समारंभात पुरस्कृत करण्यात येईल. परीक्षक मंडळातर्फे सर्वांना मार्गदर्शन करण्यात येईल.

प्रशिक्षक म्हणून विद्यार्थ्यांना उत्तम वाटेवर चालायला प्रोत्साहन मिळण्यासाठी मी माझ्याकडून करत असलेला हा एक प्रयत्न आहे. आपल्या शुभेच्छा सतत पाठीशी असतातच, पुढे असंच काही धडपडत राहात यावं याचं बळ मिळत राहील ही आशा.

आपली सदर महोत्सवासाठी उपस्थिती खूपच महत्वाची आहे. माझ्या एकंदर वाटचालीत आपल्या शुभेच्छांचा वाटा खूप मोठा आहे. प्रेक्षकांसाठी प्रवेश मूल्य नाही. मात्र विनामूल्य प्रवेशिका आपली संपर्क माहिती भरून तिकिट खिडकीवरून घ्यावयाची आहे. आपल्या संपर्क माहितीचा पुण्यातील प्रायोगिक नाटकांची तसेच अशा उपक्रमांची माहिती देण्यासाठीच वापर केला जाईल हे आश्वासन इथे देतो. देणगी स्वरूपात काही द्यावयाचे झाल्यास एक देणगी खोका ठेवला असेल त्यात जमा करावे. ह्या खोक्यातील एकंदर जमा रक्कम भरत नाट्य मंदिरच्या बॅकस्टेज सेवकांना भेट म्हणून दिली जाईल.

धन्यवाद !

आपला स्नेहांकित,

प्रदीप वैद्य

९८२२०५९४२९

Going-Solo